एटापल्ली वनपरीक्षेत्र,सेमल लाकुड तस्कर प्रकरणातील एक आरोपी गजाआड -अन्य तिघांचा शोध सुरुच

288

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
एटापल्ली (प्रतिनिधी)
एटापल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत जिजावंडी जंगलातून सुरू असलेल्या सेमल (सावरी) लाकडाच्या तस्करी प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. वनविभागाने केलेल्या धडक कारवाईत मिहीर निमाई दत्ता रा. पाखंजूर, छत्तीसगड या मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील अन्य तिन आरोपींचा शोध सुरु आहे.
मागील आठवड्यात जिजावंडी येथे सेमल लाकडाने भरलेला ट्रक जप्त करण्यात आला होता. मात्र, रात्रीच आरोपींनी ट्रक पळवून पाखंजूर येथे नेला. वनविभागाने तत्काळ कारवाई करत ट्रक पुन्हा ताब्यात घेतला आणि एटापल्ली कार्यालयात आणला. प्राथमिक तपासात तस्करीच्या या जाळ्यात चार जण सामील असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी दोन आरोपी पाखंजूर येथील तर दोन विकासपल्ली येथील असल्याची माहिती पुढे आली. मिहीर दत्ताच्या अटकेनंतर या तस्करीच्या जाळ्याचा अधिक तपास होण्याची शक्यता आहे. तस्करीतील मुख्य सुत्रधार असलेल्या मिहीर दत्ता यास शुक्रवारी, (दि.21) उशिरा अहेरी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. वनविभागाकडून आरोपीच्या वनकोठडीची मागणी करण्यात आली असून, न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. मिहीर दत्ताच्या चौकशीतून या तस्करीच्या जाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी वनविभागाची मोहीम सुरू असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सेमल लाकडाच्या तस्करीचा पहिलाच प्रकार-
जिल्ह्यात सागवान लाकडाच्या तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. जिल्ह्यातील उच्च दर्जाच्या सागवानाला देश-परदेशात मोठी मागणी असल्याने सागवान तस्करांचा नेहमीच गडचिरोली जिल्ह्याकडे डोळा असतो. मात्र जिल्ह्यात सेमल लाकडाच्या तस्करीचा हा पहिलाच प्रकार समोर आला आहे. या लाकडाचा नेमका उपयोग काय, यावर वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काहींच्या मते प्लायवूड उद्योगात, तर काहींच्या मते औषधी आणि बांधकाम क्षेत्रात याचा वापर केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here