अवकाळी पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी संकटात -मिरची, कापूस पिकाला जबर फटका

277

तिरुपती चिट्याला
गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )हवामान विभागाने वर्तविलेल्या शक्यतेनुसार शुक्रवारी, (दि.22) सायंकाळच्या सुमारास वादळी वा-यासह ढगाळी वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावसाने सिरोंचा तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. या अवकाळीमुळे तालुक्यातील मिरची, कापूस या मुख्य पिकांना जबर फटका बसला आहे. यावर्षी मिरची, कापसाला बाजारभाव कमी असल्याने भाव वाढेल या आशेने शेतक-यांनी पीक विकण्यास उशीर केला. मात्र अवकाळीमुळे दोन्ही पीक नेस्तनाबूत झाल्याने शेतक-यांना दुहेरी फटका बसला आहे. एकीकडे भाव कमी तर दुसरीकडे अवकाळीने पीक हातातून गेल्याने सिरोंचा तालुक्यातील शेतक-यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यात धानानंतर मिरची, कापूस या पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. यावर्षीही तालुक्यात 600 हेक्टर क्षेत्रात मिरीचे तर 1 हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड शेतक-यांनी केली होती. बहूतांश शेतक-यांची तोडाई आटोपली. मात्र बाजारपेठेत मिरची व कापसाला दर कमी असल्याने अनेक शेतक-यांनी योग्य भावाची प्रतिक्षा करीत पीक विकलेच नाही. परिणामी अनेक शेतक-यांनी तोडाई केलेली मिरची वाळविण्यासाठी शेतात ठेवली होती. तर कापूसही आवश्यक ठिकाणी साठवणूक करुन ठेवली होती. अशातच शुक्रवारी, सायंकाळच्या सुमारास वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मिरची व कापूस उत्पादक शेतक-यांची भंबेरी उडाली. या पावसाच्या सरीत शेतात साठवणूक करुन ठेवलेले पीक भिजल्याने तालुक्यातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील मिरची, कापूस उत्पादकांवर मोठे संकट कोसळले असून शासनाने तत्काळ पंचनामेक करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मिरची, कापूस उत्पादक शेतक-यांकडून होत आहे.

-सिरोंचा तालुक्यात धान पिकानंतर मिरची व कापूस या नगदी पिकांची सर्वाधिक लागवड केली जाते. यावर्षीही तालुक्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर मिरची तसेच कापसाची लागवड केली होती. या पिकाच्या लागवडीसाठी शेतक-यांनी मोठा खर्च केला होता. पीक हातीही आले होते, मात्र बाजारात मिरची व कापसाला रास्त दर नसल्याने शेतक-यांनी भाव वाढीची प्रतिक्षा केली. अशातच अवकाळीने झोडपून काढल्याने सदर पीक हातचे वाया गेले आहे. त्यामुळे संबंधित शेतक-यांचे सर्व नियोजन कोलमडले असून तालुक्यातील अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत.

-सिरोंचा तालुक्यात काही शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा असल्याने रब्बी हंगामात त्यांनी धानाचीही लागवड केली होती. यंदा रब्बीत 2 हजार हेक्टर क्षेत्रावर धान लावगड करण्यात आली. रोवणीचे कामे आटोपून धान आता बहरावर येत असतांना ढगाळी वातावरण तसेच अवकाळी पाऊस बरसल्याने धान पीकही संकटात सापडले आहे. अवकाळीमुळे धानावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here