सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे 20 लाख 70 हजारांचा दारुसाठ्यासह वाहन जप्त -सिरोंचा पोलिसांची धडक कारवाई; चौघांवर गुन्हा दाखल

91

-सिरोंचा पोलिसांची धडक कारवाई; चौघांवर गुन्हा दाखल
गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्याचा शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर येथे बुधवारी, (दि. 21) पोलिसांनी टाकलेल्या धडक कारवाईत तब्बल 17 लाख 20 हजारांच्या दारुसाठ्यासह वाहन असा एकूण 20 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कारे कोरके गावडे (38), समया बापू दुर्गम (32), सडवली बापू दुर्गम (32) तिघेही रा. झिंगानूर व रुपेश कारेंगला (32) रा. देचलीपेठा ता. अहेरी या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिरोंचा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सिरोचाअंतर्गत येत असलेल्या उपपोस्टे झिंगानूर हद्दीतील झिंगानूर येथील कारे गावडे याने अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारुची साठवणूक केली असल्याची गोपनीय माहिती सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा व उपपोस्टे झिंगानूर यांचे संयुक्त पोलीस पथकाने संयुक्त मोहिम राबवित गावडे याच्या घरावर धाड टाकली. यावेळी घरातून तब्बल 12 लाख 40 हजार रुपयांचा देशी दारुचा साठा आढळून आला. गावडे याची सखोल चौकशी केली असता त्याने सदरची दारु समया दुर्गम व सडवली दुर्गम यांची असून त्यांचे घरीसुद्धा दारुचा साठा असल्याची माहिती दिली. तत्काळ पोलिसांनी दोघांच्या घराकडे कुच केली. मात्र पोलिसांचा सुगावा लागल्याने दोन्ही आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. यावेळी अंगणा उभ्या असलेल्या ए. पी. 15 एम 1088 या बोलेरो वाहनाची तपासणी केली असता वाहनात 4 लाख 80 हजार रुपये किंमतीची देशी दारु व साडेतीन लाखाचे वाहन असा एकूण 8 लाख 30 हजाराचा मुद्देमाल आढळून आला. सदर काराई उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे झिंगानूरचे पोउपनि अभिजीत घोरपडे व अंमलदार, उपपोस्टे बामणीचे नरेंद्र दुबे, सचिन जाधव, राजु चव्हाण, आनंद खोब्रागडे, नईम शेख यांनी पार पाडली.

रुपेश कारेंगला करीत होता दारुचा पुरवठा
कारे गावडे याची पोलिसांनी पुन्हा कसून चौकशी केली असता दारुचा पुरवठा अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथील रुपेश कारेंगला करीत असल्याचे सांगितले. कारे गावडे यास अटक करीत चारही आरोपींविरोधात उपपोस्टे झिंगानूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समया दुर्गम, सडवली दुर्गम व रुपेश कारेंगला हे तिन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. पुढील तपास उपपोस्टे झिंगानूरचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत घोरपडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here