


-प्रशासनात खळबळ; दोन दिवसात खरेदी केंद्र सुरु करण्याचे आश्वासन
गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
सिरोंचा (प्रतिनिधी)
ऊन्हाळी धान पीक निघून पंधरा दिवसाचा कालावधी लोटूनही सिरोंचा तालुक्यात शासनाचे आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकरी संकटात सापडले होते. याबाबत अनेकदा विनंती, निवेदन करुनही प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्याने सिरोंचा तालुका कॉंग्रेसच्या नेतृत्वात तालुक्यातील शेकडो शेतक-यांनी मंगळवारी, (दि.20) तहसिल कार्यालयासमोर बेमूदत धरणे आंदोलन पुकारले. या आंदोलनाचा धसका घेत तहसिलदांनी दोन दिवसात धान खरेदी करण्याचे आश्वासन दिल्याने दुपारच्या सुमारास आंदोलन तात्पूरते स्थगित करण्यात आले.

सिरोंचा तालुक्यात अनेक शेतक-यांनी ऊन्हाळी धान पीक हाती घेतले होते. धान निघून अनेक दिवंसाचा कालावधी लोटूनही खरेदी धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतक-यांना धान घरातच साठवूण ठेवावे लागले होते. हमीभावाने विक्रीची आशा असलेले शेतकरी प्रशासनाकडून खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत होते. मात्र, मे महिना उजाडूनही केंद्र सुरू न झाल्याने शेतक-यांपुढे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. काहींनी धान खासगी व्यापाऱ्यांना तोट्यात विकले, काहींचे धान पावसाच्या भीतीने सडण्याच्या स्थितीत होते. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधित सिरोंचा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांच्या नेतृत्वात शेतक-यांनी सोमवारी, सकाळी 10 वाजता सिरोंचा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात शेकडो शेतकरी, युवक व महिला सहभागी होत कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता.

यावेळी माजी जिप. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतक-यांच्या समस्या जाणून धेत तत्काळ प्रशासनाने धान खरेदी बाबत निर्णय घेण्याची मागणी केली. दरम्यान सिरोंचा तहसिलदार नीलेश होणमोरे यांनी आंदोलनस्थळी येऊन उपस्थितांशी संवाद साधला. वरिष्ठ पातळीवर खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भात चर्चा सुरु असून पुढील दोन-तीन दिवसांत कार्यवाही अपेक्षित असल्याचे आश्वासन दिल्याने काँग्रेसने आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र तत्काळ प्रशासनाने कार्यवाही करीत धान खरेदी केंद्र सुरु न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांनी दिला.
यावेळी माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, कृउबासचे संचालक मालिकार्जून अकुला, नागराज इंगीली, माजी उपसरपंच रवी सल्लम, सारय्या सोनारी, उपसरपंच अशोक हरी, उपसरपंच राम गोगुला, एम. ए. अल्ली, संपत अंबाला आदींसह कॉंग्रेस कार्यकर्ते व बहूसंख्य शेतकरी उपस्थित होते.


























