मुसळधार पावसात सी-60 व सीआरपीएफ जवानांद्वारे मोहिम फत्ते -कोपर्शी जंगलात ८ तास चकमक

410

T NEWS मराठी नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी)
छत्तीसगड राज्य सीमावर्ती भाग असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी गावानजीकच्या जंगलात जिल्हा पोलिस दलाच्या सी-६० तसेच सीआरपीएफच्या जवानांच्या पथकाने तब्बल आठ तास चाललेल्या नक्षल्यांशी चाललेल्या धुम्मचक्रीत चार नक्षलींना कंठस्नात घालण्यात बुधवारी, (दि़ २७) पहाटे यश मिळविले़ यात एका पुरुषासह तीन महिला नक्षलींचा समावेश आहे़
प्राप्त माहितीनुसार 25 ऑगस्टला भामरागड तालुक्याच्या टोकावर असलेल्या छत्तीसगड सीमेलगतच्या कोपर्शी परिसरात गट्टा दलम आणि कंपनी क्रमांक १० व इतर नक्षली बैठकीसाठी आले असून यात काही मोठ्या नेत्यांचा देखील समावेश असल्याची गुप्त माहिती माहिती जिल्हा पोलिस दलाला प्राप्त झाली़ या माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरीक्त पोलीस अधीक्षक एम़ रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० जवानांसह सीआरपीएएफच्या तुकड्या नक्षलविरोधी अभियानासाठी रवाना केल्या़ दोन दिवस नक्षल विरोधी अभियान राबवित असताना बुधवारी, (दि़ २७) पहाटे ५ वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरुन असलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला़ यावेळी जवानांनीही चोख प्रत्यूत्तर दिले़ सदर चकमक तब्बल आठ तास चालली़ चकमकीनंतर नक्षली जंगलाचा आधार घेत पसार झाले़ जवानांनी परिसरात शोध मोहिम राबविली असता चार नक्षल्यांचे मृतदेह, शस्त्रसाठा व नक्षल साहित्य आढळून आले़ यामध्ये तीन महिला व एका पुरुष नक्षलीचा समावेश आहे़ चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने अद्यापही काही नक्षली लपून बसल्याची शक्यता असल्याने या जंगल परिसरात नक्षल विरोधी मोहिम सुरुच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़
नक्षली बैठकीत केंद्रीय समिती सदस्यांचा समावेश?-
प्राप्त माहितीनुसार 25 ऑगस्ट रोजी छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी गावालगतच्या घनदाट जंगल परिसरात गट्टा दलम व कंपनी क्रमांक १० व इतर नक्षलवादी बैठकीसाठी एक! आले होते़ यामध्ये काही मोठ्या नेत्यांचा देखील समावेश होता़ विशेष म्हणजे दोन दिवस या परिसरात केंद्रीय समिती सदस्य सोनू उर्फ भूपती आणि कोसे हे दोघेही ठाण मांडून बसले असल्याची माहिती आहे़
मुसळधारेत जवानांची नक्षल विरोधी मोहिम यशस्वी-
कोपर्शी जंगलात नक्षली ठाण मांडून असल्याची माहिती प्राप्त होताच वरिष्ठांच्या आदेशानुसार या जंगल परिसरात सी-६० जवानांचे १९ तर केंद्रीय राखीव पोलिस दल तसेच जलद प्रतिसाद दलाचे दोन पथके नक्षलविरोधी अभियानावर रवाना करण्यात आले होते़ या भागात प्रचंड पाऊस सुरु असतांनाही दोन दिवस अत्यंत प्रतिकूल परिस्थतिचा सामना करीत जवानांनी नक्षलविरोधी मोहिम राबवित बुधवारी सकाळी चार नक्षल्यांचा खात्मा करण्यात यश मिळविले़
नक्षली चळवळीला मोठा धक्का-
चकमकीत अनेक नेते, सदस्य मारल्या गेल्याने तसेच नवीन भरती बंद असल्याने जिल्ह्यात नक्षल चळवळ कमकवून झाली आहे़ मागील चार वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीला मर्यादा आल्याचे चित्र आहे़ तर शेजारच्या छत्तीसगडमध्येही नक्षल विरोधी मोहिम तीव्र झाली असल्याने नक्षलींची कोंडी झाली आहे़ अशात सदस्यांशी विशेष चर्चा घडवून आणण्यासोबतच घातपाताच्या दृष्टीने कोपर्शीच्या जंगलात नक्षल्यांची बैठक बोलाविण्यात आली होती़ यात केंद्रीय समितीच्या सदस्यांचाही समावेश होता़ मात्र जिल्हा पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here