पुराचा वेढा भेदून ‘आपदा मित्र’ ठरले ‘देवदूत’ -सिरोंचात सर्पदंश झालेल्या व्यक्तीला जीवदान

402

T NEWS मराठी नेटवर्क-
गडचिरोली (सिरोंचा) (प्रतिनिधी)
मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने वेढा घातलेला असताना, एका सर्पदंश झालेल्या व्यक्तीसाठी प्रशासकीय यंत्रणा आणि ‘आपदा मित्र’ देवदूत बनून धावले. सिरोंचाचे तहसीलदार नीलेश होनमोरे यांच्या तात्काळ आदेशाने आणि विविध यंत्रणांच्या समन्वयाने, पुराच्या पाण्यातून मार्ग काढत आरोग्य पथकाने वेळेवर उपचार केल्याने सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत़ चंद्रय्या कुमारी असे त्या व्यक्तीचे नाव आहे़
प्राप्त माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यातील सोमनूर नवीन येथील रहिवासी असलेल्या चंद्रय्या कुमारी यांना शनिवारी (दि़ ३०) दुपारी सापाने दंश केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे अत्यावश्यक होते. मात्र, मुसळधार पावसामुळे परिसरातील मुत्तापूर नाल्याला पूर आल्याने रुग्णालयाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. कुटुंबावर मोठे संकट ओढवले होते़ वेळेवर उपचार कसे मिळणार या चिंतेने कुटुंबिय चिंतेत होते़ या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच सिरोंचाचे तहसीलदार नीलेश होनमोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ कन्नाके यांनी तात्काळ आपदा मित्र पथक, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाला तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच, सिरोंचा येथील ‘आपदा मित्र’ मास्टर ट्रेनर किरण वेमुला यांचे पथक, पोलिस कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे पथक पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे मार्ग काढत आवश्यक बचाव साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने चंद्रय्या कुमारी यांचे गाव गाठले. आरोग्य पथकाने तातडीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट झाले. सध्या चंद्रय्या कुमारी सुखरूप असल्याची माहिती आहे.

जिल्हाधिका-यांनी केले कौतुक-
प्रशासकीय यंत्रणांनी दाखवलेली तत्परता आणि विविध विभागांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. या धाडसी कामगिरीबद्दल बचाव कार्यात सहभागी असलेल्या आपदा मित्र पथकाचे, पोलिसांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कौतुक केले आहे.

दुर्गम भागात रस्ते, उंच पुलांचा अभाव-
सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक रस्त्यांवर लहान रपटे असल्याने पावसाळ्याच्या दिवसात थोडासा जरी पाऊस आला तरी या रपट्यांवरून पाणी वाहते़ परिणामी आवागमन पूर्णत: बंद होते़ पावसाळ्यातील तीन महिने तालुक्यातील अनेक गावे संपर्काबाहेर असतात़ अशावेळी आरोग्याची सुविधा पोहोचविणे मोठे जिकीरीचे असते़ वेळेवर मदत मिळाल्याने चंद्रय्या कुमारी यांचे प्राण वाचले असले तरी आतापर्यंत कित्येक जणांना मदतीअभावी जीव गमवावा लागला आहे़ दुर्गम भागापर्यंत रस्ते, उंच पुलांचे बांधकाम केल्यास त्या भागातील नागरिकांना आरोग्याची सुविधा वेळेवर मिळण्यास मदत होईल़ मात्र शासन, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ते होताना दिसून येत नाही, हे विशेष़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here