माओवाद्यांच्या कट्टर जनमिलिशियास गडचिरोली जिल्हा पोलिसांनी केली अटक -पेरमिली जंगल परिसरात आढळला संशयास्पद स्थितीत

466

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
गडचिरोली(प्रतिनिधी )
माओवाद्यांच्या हिंसक कारवायात त्यांना सहकार्य करणा-या तसेच विविध गुन्ह्यात समावेश असलेल्या माओवाद्यांच्या कट्टर जनमिलिशियास गडचिरोली जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई शुक्रवारी, (31 मे)अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या पेरमिली हद्दीतील जंगल परिसरात पार पाडण्यात आली. सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा (23) रा. तोयामेट्टा, ता. ओरच्छा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षल समर्थकाचे नाव आहे. त्याचेवर शासनाने दीड लाखाचे बक्षिस जाहीर केले होते.
सविस्तर वृत्त असे आहे की, उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरिमिली हद्दीतील जंगल परिसरामध्ये शुक्रवारी, विशेष अभियान पथक, प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित असतांना त्यांना सदर जंगल परिसरामध्ये एक संशयित व्यक्ती फिरत असतांना आढळुन आला. विशेष अभियान पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा असून, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्रांमध्ये सक्रिय सहभाग होता. तसेच सन 2023 ला हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस-माओवादी चकमकीच्या अनुषंगाने त्याचेवर एटापल्ली पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यास तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी यांच्या ताब्यात देऊन अटक करण्यात आली.

माओवाद्यांच्या गैरकृत्यात करीत होता मदत –
अधिक तपास केला असता सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा हा सन 2020 पासून जनमिलिशीया सदस्य म्हणून काम करीत होता. तो गावात राहून माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवण, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती माओवाद्यास पुरविणे, पोलीसांविरुध्द कट रचणे, नक्षल सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत असल्याचे निष्पन्न झाले.

खुन, चकमकीसह 7 गुन्हे दाखल –
नक्षली समर्थक सोमा ऊर्फ दिनेश याचा छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील मौजा कुतूल येथील आगुळी वडदा नावाच्या एका निरपराध इसमाच्या खुनात प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच सन 2020-21 झालेल्या छत्तीसगड राज्यातील कुतुल व दुरवडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीसह 2022 मध्ये झालेल्या मोहंदी गावालगतच्या जंगल परिसरात झालेल्या पोलिस चकमकीतही त्याचा सहभाग होता. कोकामेटा गावातील भुसुरूंग स्फोट घडवून आणणे, मोहंदी तसेच कुतूल मार्गावर जमिनीत स्फोटक पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

2022 पासून आतापर्यंत 79 माओवाद्यांना अटक –
गडचिरोली जिल्हा पोलिसांद्वारे नक्षलींना चोख प्रतिउत्तर देण्यात येत आहे. यात अनेक जहाल नक्षल्यांना ठार करण्यात आले आहे तर अनेकांना अटक झाली आहे. यामुळे नक्षल चळवळ खिळखिळी झाली आहे. जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 79 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here