


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –

अहेरी (प्रतिनिधी )
घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मध्यरात्री अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची थरारक घटना 2 जून रोजी अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त छल्लेवाडा या गावात उघडकीस आली. चरणदास गजानन चांदेकर (48) असे जळालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरु आहेत.


जाळलेल्या व्यक्ती 👆
प्राप्त माहितीनुसार, आठवडाभरापासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. वाढलेल्या तापमानाच्या जिल्ह्याच्या घनदाट जंगलातील गावातही उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे हैराण नागरिक रात्री घरापुढील अंगणात झोपतात. जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात येत असलेल्या नक्षलग्रस्त छल्लेवाडा येथील रहिवासी असलेले चरणदास चांदेकर हे सुद्धा घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले व आगपेटीने आग लावली. त्यानंतर तो पळून गेला. यावेळी त्यांच्या बाजूला दुसऱ्या खाटेवर झोपून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना ही बाब समजताच त्यांनी आग विझवली. परंतु तोपर्यंत आगीच्या ज्वाळांमुळे चरणदासचे शरीर भाजले गेले. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेपनपल्ली पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांपुढे आरोपी शोधण्याचे आव्हान –
चरणदास यांना पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रेपनपल्ली पोलिसांनी प्राथमिक गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. गावात चांदेकर यांच्याशी कुणाचा वाद नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर इतक्या क्रूरपणे हल्ला करून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. दरम्यान पोलिसांना गावातील काही लोकांवर संशय असून लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चरणदासची मृत्यूशी झुंज –
नक्षलग्रस्त छल्लेवाडा येथील रहिवासी चरणदास चांदेकर हे घरासमोरील अंगणात खाटेवर झोपले असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. यात त्यांचे शरिर भाजल्याने त्यांना लागलीच चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने चरणदासची मृत्यूशी झुंज सुरु आहे.





























