


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांच्या नुकसानीसह अनेक घरांची पडझड झाली आहे. अशातच तालुक्यातील सूर्यरावपल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवारात असलेल्या जीर्ण अवस्थेतील अंगणवाडी इमारतीचा काही भाग कोसळला गेला. सुदैवाने यावेळी अंगणवाडी कुणीही नसल्याने अनूचित प्रकार टळला. त्यामुळे अंगणवाडीसह शाळेची इमारत निर्लेखित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील सूर्यरावपल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारतीसह याच शाळेच्या आवारात असलेली अंगणवाडीची इमारत जीर्णावस्थेत आहे. मागील अनेक वर्षापासून सदर इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे पुरस्थिती निर्माण झाली असून शेकडो हेक्टर पिकांना याचा फटका बसला आहे, तर काही घरांची पडझड झाली आहे. अशातच सूर्यरावपल्ली शाळा आवारात असलेल्या जीर्ण अंगणवाडी इमारतीचा काही भाग अचानक कोसळला गेला. सुदैवाने यात कोणतीही वित्तहानी झाली नाही. सदर शाळेची इमारती जुनी असून अंगणवाडीचीही इमारत जीर्णावस्थेत आहे. या दोन्ही जीर्ण इमारती धोकादायक स्थितीत असतांना या इमारतींची दुरुस्ती वा नव्याने बांधकाम करण्यात आलेले नाही. चिमूकले विद्यार्थी धोकादायक स्थितीत येथे शिक्षणाचे धडे गिरवित असतांना स्थानिक प्रशासनानेही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले असल्याने पालक वर्गात असंतोष व्यक्त होत आहे. भविष्यात अनुचित घटना घडू नये याकरिता दोन्ही इमारतीचे निर्लेखन करावे, अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांकडून होत आहे.

- बाल विकास अधिकारी (नगरी) यांच्या दुर्लक्ष –
जीर्ण अंगणवाडी इमारती संबंधी बाल विकास प्रकल्प अधिकारी (नगरी )गडचिरोली यांना अनेकदा माहिती दिल्यावर सुद्धा सदर जीर्ण इमारतीकडे cdpo (नगरी )अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केल्याची आरोप सूर्यारावपल्ली येथील नागरिकांनी केले आहेत.





























