


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
मोठा गाजावाजा करीत सिरोंचा ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत रस्त्याचे काम जोमाने गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. सिरोंचा पासून कारसपली पर्यंत 15 किमी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. कारसपली ते रंगय्यापल्ली सोडून बामणीकडे काम चालू आहे. अद्यापही बरेचसे काम शिल्लक आहे. सुरुवातीपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम वादग्रस्त ठरले असताना पुन्हा यात भर पडली आहे. सिरोंचा ते आलापल्ली महामार्गाअंतर्गत येत असलेल्या पोचमपल्ली फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गाला अल्पावधीतच अनेक ठिकाणी तडा गेल्याने सदर बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरविण्याचा राज्याचा संकल्प आहे. याअंतर्गत आदिवासीबहूल, नक्षलप्रभावित, उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यातही राष्ट्रीय महामार्गाला मान्यता प्रदान करण्यात आली. आष्टी- आलापल्ली-सिरोंचा मार्गावर राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत काम हाती घेण्यात आले आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या संथ कामकाजामुळे कामाच्या प्रारंभीपासून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरीक, विविध सामाजिक संघटनाचा वाढता रोष लक्षात घेता कामाला गती देण्यात आली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात निकृष्टतेची प्रचिती सिरोंचा-आलापल्ली महामार्गाच्या बांधकामावरुन आली आहे. सिरोंचा मार्गावर असलेल्या पोचमपल्ली फाट्याजवळील रस्त्याला अल्पावधीतच तडे गेल्याने कंत्राटदाराच्या कामकाजावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
अपघातास जबाबदार कोण?-
राष्ट्रीय महामार्गाचे काम दीड वर्षांपासून सुरू असले तरी कामाची गती मंद आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने वाहतूक सुरू असते. या मार्गावर चारचाकी वाहन, अवजड वाहनचालक भरधाव वेगाने वाहन पळवतात. रस्त्याच्या एकाबाजूने चालत असलेल्या दुचाकी वाहन चालकांना या अर्धवट भागामुळे आपले वाहन रस्त्याच्या मध्यभागी चालवावे लागते. सदर मार्ग ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आला आहे. त्यातच धूळ असल्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. परिणामी दुचाकी वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याचसोबत हा रस्ता वर-खाली असल्यामुळे वाहन घसरण्याचाही धोका राहतो. अशातच जर अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.






























