


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
आलापल्ली (प्रतिनिधी)
अहेरी शहरातील रस्त्यांची समस्या दूर करण्याच्या आश्वासनाकडे स्थानिक आमदारांना विसर पडला पडल्याचा आरोप करीत ‘क्या हुवा तेरा वादा’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातर्फे आलापल्ली येथील शहिद वीर बाबुराव शेडमाके चौकात आज, 23 जून रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या भाग्यश्री आत्राम म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीत महायुतीने जाहीरनाम्यात खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली. सत्तेत आल्यानंतर एकही आश्वासनाची पूर्तता होताना दिसत नाही. उलट संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेचे व लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही. जनता हवालदिल झाली आहे. ही ढोंगी महायुती सरकार आहे. आमदारांनी निवडणुकीपूर्वी जनतेला क्षेत्रातील रस्त्यांची समस्या प्रथम प्राधान्याने दूर करू, असे आश्वासन दिले होते. मात्र आज त्या आश्वासनांचा आमदारांना विसर पडला आहे, असा आरोप त्यांनी केला. लाडकी बहीण योजना आणि निराधार योजना दरमहा 1500 वरुन 2100 रुपये करण्यात यावे, डीबीटीच्या नावावर संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अनुदान बंद करण्याचे थांबवून पूर्ववत सुरू करावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, धानाला प्रतीहेक्टर 25 हजार बोनस द्यावा, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना 15 हजार मानधन देण्यात यावे, रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्वरित रस्त्यांचे कामे करण्यात यावीत, वनहक्काचे पट्टे त्वरीत देण्यात यावे आदी मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. ठिय्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, प्रकाश ताकसांडे, श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, जहीर हकीम, अप्सर पठाण, हिमायत अली, स्वप्नील श्रीरामवार, सुमित मोतकुरवार, अहेरी क्षेत्रातील अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यातील अंदाजे 700-800 तरुण, तरुणी, वृद्ध तसेच कार्यकर्ते उपस्थिती होते.



























